कोर्ले गावचे ग्रामदैवत श्री.जुगाई देवी गाव रहाटीतील मुख्य देवस्थान. देवालयामध्ये पाषाणामध्ये सुबक, रेखीव काम केलेल्या श्री. जुगाई देवीच्या मूर्तीसोबत असलेल्या कालिकादेवी, पावणादेवी, चौंडेश्वरी देवी, रिध्दी सिध्दी या मूर्ती म्हणजे उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुनाच !
      याच मंदिरातून श्री. जुगाई देवीची पालखी नटून, थटून निशाण अब्दागीर या सर्व साजश्रुंगारासहित शिमगोत्सवामध्येही घरोघरी जात असते. खेळेनृत्य, कारली तळी, पालखीनृत्य या विविध प्रकारांतुन देवीचा आशीर्वाद भक्तगणांना मिळत असतो.
      याच मंदिराच्या पूर्वेला असलेले भावकाईदेवी मंदिर, पश्चिमेला असलेले रामेश्वर मंदिर तर समोरच्या बाजूला असलेले सोमेश्वर मंदिर यामुळे हा सर्व परिसर अतिशय पवित्र व भक्तिमय होतो.
      श्री. देवी जुगाई मंदिर हे गावरहाटीतील प्रमुख मंदिर. या बरोबरच ब्रह्मदेव मंदिर, श्री. विठलाई देवी मंदिर, गांगोभराडी दुर्गाडी देवी, अंतेश्वर मंदिर, कालभैरव मंदिर, विष्णुमंदिर, श्री. दत्तमंदिर ही काही प्रमुख मंदिरे कोर्ले गावच्या प्राचीन शिल्पकलेचा, अध्यात्माचा, धार्मिक सहिष्णुतेचा, भावभक्तीचा दाखला देत आज वर्षानुवर्षे सांस्कृतिक समृध्दीचा वारसा जपत आहेत.
  स्थापना १ /१२/१९९१
  लोकसंख्या ६८१(सन -२०११ च्या जनगणनेनुसार)
  मिळालेले पुरस्कार -
    १) निर्मल ग्राम
    2) तंटामुक्त गाव
    3) पर्यावरण विकासरत्न
    4) हगणदारीमुक्त गाव
      ग्रामपंचायत कोर्ले यांच्या माध्यमातून सन २०१० ते २०१५ या कालावधीत ‘हरियाली’ या सारखी योजना राबवुन गावातील पडीक क्षेत्र फळबाग लागवड व सिंचनाखाली आणले. १३ वा केंद्रीय वित्त आयोगाच्या माध्यमातून गावातील वाडीवाडी मध्ये पायवाटा दुरुस्ती, नळयोजना दुरुस्ती या सारखी विकास कामे पुर्ण करणेत आली. ‘पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेंतर्गत’ गावामध्ये वृक्षलागवड, CFL, LED बल्बचा वापर, स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते तयार करणे यासारखी विकासकामे हाती घेणेत आली.
      नुकत्याच सुरु झालेल्या १४ वा केंद्रिय वित्त आयोग निधी हा फक्त ग्रामपंचायतींना थेट उपलब्ध होणार असून सदर योजनेंतर्गत निवड करावयाच्या कामांचा अधिकार हा मासिक सभा व सदर कामांना अंतिम मंजुरी ग्रामसभेची असल्याने सन २०१५/१६ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीमधून गावामध्ये ‘स्ट्रीटलाईट बसवणे’ ह्या अत्यावश्यक कामाला ग्रामसभेने मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायत कोर्लेची विशेष अभिनंदनीय बाब म्हणजे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तसेच सरपंच व उपसरपंच हे देखील बिनविरोध आहेत. गावातील ग्रामसभा शक्यतो तहकूब होत नाहीत.
      वाचनालयात सभासद, वाचक यांचेसाठी सुसज्ज असा मुक्त वाचन विभाग केलेला आहे. वाचन विभागात निरनिराळी मासिके, पाक्षिके, दैनिके उपलब्ध करुन दिलेली आहेत. याचा लाभ दिवसभरात जवळजवळ ५० सभासद, वाचक घेत असतात. या विभागाचा फायदा विद्यार्थीवर्गाला आपल्या अध्ययनासाठीही होत आहे.
      वाचनालायामध्ये विविध विषयांवरची ३००० पुस्तके उपलब्ध आहेत, व या ग्रंथसंपदेमध्ये वेळोवेळी वाढ होत असते.
कोकणासारख्या दुर्गम भागात उत्तम वाचन संस्कृती रुजविणे आणि त्या माध्यमातून सुसंस्कृत समाज निर्माण करणे हे या वाचनालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
      'वाचेल तो वाचेल' या उक्तीप्रमाणे जो नियमित वाचन करेल तोच या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहील, म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त वाचनाची आवड कशी निर्माण होईल यासाठी ग्रामस्थ नेहमी प्रयत्नशील असतात.
      अंगणवाडी, दोन प्राथमिक शाळा व एक माध्यमिक शाळा अशा सुसज्ज इमारती, उत्कृष्ट व्यवस्थापन व उत्तम शैक्षणिक दर्जा यांमुळे या शाळांतील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात उज्ज्वल यश संपादित करत आहेत. नुकताच कोर्ले धालवली माध्यमिक विद्यालयाचा ‘सुवर्णमहोत्सव’ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
      गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व शिमगोत्सव हे खऱ्या अर्थाने श्रध्दा, संस्कृती, भक्ती याचे मूर्तिमंत सोहळे असतात. गणेशोत्सवामध्ये घरोघरी गणरायाचं वाजत गाजत आगमन होतं. कोकणामध्ये सांस्कृतिक गणेशोत्सवापेक्षा खऱ्या अर्थाने ‘घराचा गणपती’ हा अधिक जिव्हाळ्याचा, भक्तीचा. रोज आरती, सुस्वर भजने, भारुडे याने गणपतीचे पाच/सात दिवस उत्सवाचे, आनंदाचे आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवणारे असतात.
      नवरात्र उत्सवात जुगाई देवीची मूर्ती साडी चोळी नेसवून अलंकारांनी सजविली जाते. नऊ दिवस नऊ माळा व दहाव्या दिवशी ‘सीमोल्लंघन’ म्हणजेच दसरा. नऊ दिवस ही आदिशक्ती आदिमाया आपल्याला वेगवेगळ्या रुपात दर्शन देते. रोज धुपारत, आरती, पालखी प्रदक्षिणा व नंतर हरिदासांचे कीर्तन, नामस्मरण याने प्रत्येक रात्र ही श्रध्देने भक्तिभावाने रंगून जाते.
      शिमगोत्सव हा तर कोकणातील सणांचा राजा. श्री. जुगाई मंदिराची व चव्हाटयावरील होळी घालून या सणाची सुरुवात होते. श्री. देवी जुगाई आठ नऊ दिवस गावातील भक्तगणांना आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी साजश्रुंगारासह पालखीत बसून जात असते. प्रत्येकाच्या घरी तिची ओटी भरून, कापडखेळ्यांचा खेळ, तळी, काटली, गाऱ्हाणे व शेवटी ढोल ताशांच्या तालावर पालखी नृत्य करून मनोभावे सेवा केली जाते.
      ’श्री. देवी जुगाई ढोलपथक’ तर खऱ्या अर्थाने पारंपारिक ढोल वादन व पालखी नृत्य याचा सुंदर अविष्कार म्हणावा लागेल. या ढोलपथकाने मुंबई पासून ते देशाची राजधानी दिल्ली पर्यंत आपली कला सदर केली आहे. अनेक मिरवणूका, गणेशविसर्जन, वेगवेगळे कला महोत्सव यांमध्ये हे ढोलपथक आपला कलाविष्कार सदर करून रसिकांच्या प्रशंसेला पात्र ठरले आहे.