नावाप्रमाणेच निसर्गातून जणू सुरेख कोरून काढलेले देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगाव. उत्तरेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची वळणदार सीमारेषा रेखणारी विजयदुर्गची खाडी हिरवे गार शेतमळे, गावापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर विराजमान आहे. स्वयंभू श्री ब्रह्मदेव! तथापि येथे देवाची घडीव मूर्ती नसून एका वक्राकार जांभ्या कातळाच्या उंचवट्याला स्वयंभू ईश्वर स्वरूप मानले जाते. पुराणोक्त श्री ब्रह्मदेव चातुर्वेदरूप चतुरानन म्हणून हे देऊळ पूर्वापार बिनभिंतींचे म्हणजे चारी दिशांनी मोकळे आहे. श्री ब्रह्मदेव टेकडीच्या पायथ्याशी बारमाही पाण्याचा अंतस्त्रोत(झरा) असून तीन सुबक बांधीव तळ्यांतून ते निर्मळ जळ सतत ओसंडून वाहत असते. देवस्थानची पूजाअर्चा, महाप्रसाद यांसाठी या 'तीन तळी' तले पाणी वापरले जाते. या पाण्याची चव अवीट ! इथून देवळाकडे चढून जाण्यासाठी पायऱ्या-पायऱ्यांची चिरेबंदी घाटी आहे. पायथ्याशी केवडयाचे बन, सभोवतालच्या देवराईतील सुरंगी, हेळे, वड, आदी वृक्षराजी ,विविध झाडी झुडपे, नानाविध पक्षांचे कुंजन, वानरादी वनचरांचा मुक्त वावर यांमुळे देवळाचा परिसर मंगल व उदात्त वाटतो .
कोकणातल्या प्रत्येक महत्वाच्या देवस्थानामागे असते तशी एक दंतकथा (लोककथा) कोर्ल्याच्या श्री ब्रह्मदेवाशी निगडीत आहे. सुमारे अडीच तीनशे वर्षांपूर्वी श्री सदाशिव गोरुले नामक स्थानिक शेतकरी या डोंगराळभागात वरकस शेतीसाठी नांगरणी करीत असता नांगराचा फाळ एका खडकात अडकला नंतर त्या ठिकाणी एक गाय पान्हा सोडीत असल्याचे दृश्य दिसून त्याला
इथे ईश्वरी अधिष्टान असल्याचा दृष्टांत झाला, यथाकाल या ठिकाणास श्री ब्रह्मदेव मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले.
इथले एकूण वातावरण निर्मळ, निरामय असून भवतापाने पोळलेल्या, ताणतणावांनी गांजल्या मनाला आध्यात्मिक शांती देण्याचे सामर्थ्य या पवित्र वनस्थळीला लाभले आहे, हे निर्विवाद. प्रतिवर्षी हजारो भाविक व पर्यटक भेट देतात. तसेच कौटुंबिक व शैक्षणिक सहलीही आयोजित केल्या जातात. सृष्टीनिरीक्षक इथे वाढत्या संख्येने येत असतात. मंदिराची पूजाअर्चा, रुद्रानुष्ठानादी नित्यकर्मे व देखभाल सुविहितपणे केली जाते. श्रावण महिन्यात तर रुद्रघोषाने इथला अणुरेणु निनादून उठतो.
      या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सभोवताली ‘संरक्षित देवराई’ आहे. या देवराईमध्ये सुरंगी, हेळे, वड, शेवर, करमळं असे मोठेमोठे वृक्ष आहेत. अनेक आयुर्वेदिक उपयोगी वनस्पती या देवराईमध्ये आढळून आल्या आहेत. या देवराईचे जतन, संवर्धन व संरक्षण व्हावे म्हणून देवालाय ट्रस्ट विशेष लक्ष देत आहे. या देवराईमध्येच ‘नक्षत्रवन’ साकारण्याचा संकल्प देवालय ट्रस्टने केला आहे.
देवराईमधील काही वृक्षांची माहिती